– संत्रा व मोसंबी फळबागांची पाहणी; नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना फळगळ नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
मोवाड :- नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबी पिकांमध्ये काही ठिकाणी होत असलेल्या फळगळीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकारी व शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. फळबागांची सद्यस्थिती, पिकांची वाढ, अन्नद्रव्यांची उपलब्धता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडून संत्रा व मोसंबी पिकातील फळगळीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी व अर्जांच्या अनुषंगाने कृषी विभागाने ही पाहणी व मार्गदर्शन मोहीम राबविली. यावेळी खेडी कर्यात व गोधनी गायमुख परिसरातील संत्रा व मोसंबी बागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या शेतातील परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वंडली फार्मच्या शास्त्रज्ञ ए. डी. बागडे मॅडम यांनी संत्रा व मोसंबी पिकातील फळगळ होण्यामागील विविध कारणांची सविस्तर माहिती दिली. फळबागांमध्ये संतुलित खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर, कीड व रोग व्यवस्थापन तसेच बहार व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. केवळ फळगळ झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी फळबागेच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बदलत्या हवामानामुळे तापमानातील चढ-उतार, अनियमित पाऊस, आर्द्रतेतील बदल यांचा फळबागांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांचे नियमित निरीक्षण करावे, असे आवाहनही करण्यात आले. बागेतील झाडांची अवस्था, फळधारणा, पानांचा रंग, नवीन वाढ, कीड व रोगांची लक्षणे यांचे वेळोवेळी निरीक्षण करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला.
उप कृषी अधिकारी पी. आर. कोकाटे यांनी संत्रा व मोसंबी पिकाच्या मुख्य वाढीच्या काळातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापर करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच फळबागांमध्ये अनावश्यक खर्च टाळून शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.
कृषी विभागाच्या या प्रत्यक्ष बांधावर भेटीमुळे नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळगळ नियंत्रणासोबतच फळबागेच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळाले. शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील समस्या कृषी विभागाच्या अधिकारी व तज्ज्ञांच्या निदर्शनास आणून देऊन वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी के. डी. कोळी, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. चंडीमेश्राम, उप कृषी अधिकारी पी. आर. कोकाटे, कृषीसेवक एम. आर. खरवडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या या ‘शेतकऱ्यांच्या बांधावर’ प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळगळ नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत फळबागांची योग्य निगा राखण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.








