Ø गणेश मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन
Ø 7 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
Ø तालुकास्तरावर 25 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक
Ø जिल्हास्तरावर 50 हजारांचे प्रथम पारितोषिक
यवतमाळ :- राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीनही स्तरांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबरपर्यंत आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एका मंडळाची निवड करून गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या मंडळांचा गौरव केला जाणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना महत्व
गणेशोत्सव मंडळांचे परीक्षण विविध बाबींच्या आधारे केले जाणार आहे. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन, सांस्कृतिक उपक्रम, गड-किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, सामाजिक उपक्रम, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार-प्रसार, आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य यांचा समावेश आहे. याशिवाय कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी, नवसंशोधन, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट तसेच प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती यांसारख्या बाबींचय आधारे परीक्षण केले जाणार आहे.
घरबसल्या घेता येणार गणेशदर्शन
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे महाराष्ट्रातील घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती तसेच विविध प्रसिद्ध गणेश मंदिरांमधील गणपतीचे लाईव्ह दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. नागरिकांना आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्रही या पोर्टलवर विनामूल्य प्रसिद्ध करता येणार आहे. सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता यावे यासाठी अधिकाधिक गणेश मंडळांनी तसेच कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे कला अकादमीच्या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेअंतर्गत तालुकास्तरावर गुणानुक्रमानुसार प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावरील विजेत्याना 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याना 40 हजार रुपये व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याना 30 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय 17 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्धारित मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय निवड समिती यांनी केले आहे.





