नागपूर :- विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी श्री अकादमी, ओमकार नगर, नागपूर च्यावतीने JEE, NEET, NDA व MHT-CET परीक्षेत यश संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. रविवारी २३ ऑगस्ट रोजी बाकडे सेलिब्रेशन, नागपूर येथे हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उत्साहात पार पडला. श्री अकादमीच्या संचालिका डॉ. जयश्री मडावी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक तयारी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री अकादमीकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जाते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पांडव, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. IPS लोहित मतानी, डॉ. भौमिक, डॉ. चौधरी, डॉ. दामयंती वाळके तसेच प्रा. माधुरीताई पालीवाल यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे श्री अकादमीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर JEE, NEET, NDA आणि MHT- CET या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित करून केलेली मेहनत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालकांनी आपल्या मुलांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत श्री अकादमीच्या संचालिका, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीदरम्यान मिळालेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांच्या यशासाठी उपयुक्त ठरल्याचे पालकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. श्री अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.





