– राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; पावडदौना ते पानमारा बससेवा सुरू
किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील पावडदौना, वांजरा, मोहखेडी, वडणा, चिरव्हा, नांदगाव आणि पानमारा या गावांतील विद्यार्थी, प्रवासी व नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या मार्गावर दीर्घकाळापासून एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मौदा येथे ये-जा करण्यासाठी पायी किंवा सायकलचा आधार घ्यावा लागत होता. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे यांनी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन संबंधित गावांसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली. यासंदर्भात निवेदन देत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची तातडीने दखल घेत राज्यमंत्री जयस्वाल यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन बससेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला.या पाठपुराव्याला अखेर यश आले असून २४ ऑगस्ट २०२६ पासून मौदा–पावडदौना–वांजरा–मोहखेडी–वडणा–चिरव्हा–नांदगाव–पानमारा या मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांना मौदा शहराशी नियमित वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली.
यावेळी ग्रामस्थांनी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे यांचे अभिनंदन करून आभार मानले. याप्रसंगी ग्रामस्थांनी बस ची पूजा अर्चना करून, चालक, वाहक व वांगे दांपत्याच्या गळ्यात हार टाकून त्यांचे स्वागत केले.बससेवा सुरू करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वाहतुकीची अडचण दूर झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी सरपंच शिला नितेश वांगे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ बोंबाटे, विमल गेडेकार, कंठीराम बावनकर, युवासेना पंचायत समिती सर्कल प्रमुख स्वप्नील भोयर, युवासेना शाखाप्रमुख मोहखेडी विकास निशाणे, युवासेना शाखाप्रमुख वांजरा संचित भोयर, कल्पना शहारे, सीमा चौधरी, स्वप्नील गेडेकार, रायभान हटवार, समीर निशाणे, पंकज भोयर, उमेश भोयर, किरण शहारे, अमित तिवाडे, कपिल भोयर, सुरज तिवाडे, विशाल बोंबाटे, निखिल राऊत, आदित्य भोयर, अंकित बोंबाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिक्रिया…
स्वातंत्र्यकाळापासून आमच्या गावाकडे बससेवा नव्हती. त्यामुळे शाळेत जाण्या-येण्यासाठी आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांच्या प्रयत्नाने आणि शिवसेना तालुका प्रमुख नितेश वांगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे शाळेत ये-जा करणे सोपे झाले आहे. बससेवा सुरू करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
– सृष्टी रवी भोयर व परी हरिश्चंद्र भोयर, स्थानिक विद्यार्थी





