spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिक्रमण हटाव मोहिमेचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; पवनीच्या भुयार येथील धक्कादायक प्रकार

हंसराज,भंडारा पवनी :- शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचे वार्तांकन आणि चित्रीकरण करत असताना एका पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली आहे. याप्रकरणी एम.सी.एन. न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी मनोज यादववराजी चिचघरे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास भुयार ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू होती. सार्वजनिक हिताच्या या कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार मनोज चिचघरे घटनास्थळी गेले होते. ते आपल्या मोबाईलद्वारे या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना आरोपी विलास बाळबुधे (वय ४५, रा. भुयार) यांनी त्यांना अडवले.

“तुला अक्कल नाही का?” म्हणत दिली धमकी चित्रीकरण थांबवण्यास सांगत आरोपीने चिचघरे यांना उद्देशून “तू कशाला व्हिडिओ शूटिंग करतोस, एवढा मोठा झाला तरी तुला अक्कल नाही का?” असे म्हणत भररस्त्यात शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, “तुला ठार मारीन” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कर्तव्यावर असताना मिळालेल्या या धमकीमुळे पत्रकाराने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत पोलिसांत धाव घेतली.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल मनोज चिचघरे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत पवनी पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.०५ वाजता गुन्हा नोंदविला. या प्रकरणात आरोपी विलास बाळबुधे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम २९६ (अश्लील कृत्य/शिवीगाळ) आणि ३५१(३) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी) अंतर्गत गुन्हा क्र. ०४७२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

तपासाकडे लक्ष शासकीय कामाचे आणि सार्वजनिक हिताच्या कारवाईचे वार्तांकन करणे हा पत्रकाराचा घटनादत्त अधिकार आहे. अशा प्रकारे कर्तव्य बजावत असताना पत्रकाराला धमकी दिली गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. पवनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, घटनास्थळावरील व्हिडिओ चित्रीकरण आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.