– कनेक्ट विथ कलेक्टर’ उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;
– जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जेन-झी तरूणांशी संवाद साधला.
हंसराज,भंडारा :- नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या व तक्रारींचे तातडीने निवारण करणे, पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. तरुणांनी मांडलेल्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून संबंधित विभागांनी त्यावर वेळेत कार्यवाही करावी असा विश्वास जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तरुणांना दिला.
सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात आयोजित ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जेन-झी तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत आपल्या गावातील समस्या, शैक्षणिक अडचणी तसेच भविष्यातील अपेक्षा मांडल्या.या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे,सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास तसेच संबंधित अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
भंडारा जिल्हयातील सहभागी झालेल्या तरुणांनी गावातील बसस्थानकांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ग्रामपंचायत द्वारे पावसाळयात नळाला येणारे दुषित पाण्यामुळे नागरिाकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.यामुळे साथीच्या आजार वाढळल्यामुळे कॉलरा, कावीळ, सारख्या आजारांचा परिसरात प्रार्दुभाव वाढलेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये ग्रंथालयांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्या सुविधा मिळाल्यास भविष्यात प्रशासनात काम करण्याची संधी अधिकाधिक तरुणांना मिळेल, असा विश्वास सावन कुमार यांनी व्यक्त केला.
शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक विलंब होणार नाही.तसेच नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी योग्य कागदपत्रांसह संबंधित विभागाकडे मांडाव्यात. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून प्रश्नांचे जलद निवारण होऊन जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





