spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

३.९४ कोटींची मोक्याची जागा नगर परिषदेकडे येणार; हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

संदीप कांबळे, कामठी :- कामठी शहराच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधी रुपये किमतीची मोक्याची असलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा अखेर नगर परिषद कामठीच्या ताब्यात येण्याच्या दिशेने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मौजा-कामठी येथील भुखंड क्र. एल-११ मधील ६५२५ चौ.मी. जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यातून नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. या जागेचे बाजारमूल्य तब्बल ३ कोटी ९४ लाख ७६ हजार २५० रुपये असल्याचे मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे.

नगर परिषद कामठीने सदर जागा हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर नझूल परिक्षण भूमापक तथा भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणी अहवालात जागेवर संरक्षण भिंत, लोखंडी गेट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय, गोदाम, शौचालय, शेड, रस्ते आणि भाजीपाला विक्रीची दुकाने असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

१६ हजार चौ.फुटांच्या गोदामावर १.२६ कोटींचा खर्च

या जागेवर सुमारे १६ हजार चौ.फुटांचे भव्य गोदाम उभारण्यात आले असून, त्यासाठी अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद अहवालात आहे. या बांधकामासाठी महाराष्ट्र स्टेट अॅग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डाकडून ६० टक्के रक्कम कर्जरूपाने, तर उर्वरित ४० टक्के रक्कम कृषी उत्पन्न बाजार समितीने गुंतविल्याचे नमूद आहे.

याशिवाय सुमारे ९०० चौ.फुटांचे सार्वजनिक शौचालय, लिलाव ओटे, पक्के रस्ते, २७ टिनाचे शेड, गाळे, भाजीपाला विक्रीची दुकाने तसेच ५० मेट्रिक टन क्षमतेचा वजनकाटा जागेवर असल्याचे पाहणीत आढळले.

नवीन आखीव पत्रिकेनुसार न.भू.क्र. ३३५१ वर फेरफार क्रमांक ५११ अन्वये २१ फेब्रुवारी २००९ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर यांच्या नावाची भाडेपट्ट्याची नोंद करण्यात आली आहे. नगरपालिका एल-११ क्षेत्रातील ४१२२७.९ चौ.मी. जागेच्या भाड्यापोटी सन २०२६-२७ साठी ३ लाख १३ हजार १९८ रुपये भरल्याची नोंदही अहवालात आहे.

दरम्यान, हस्तांतरणासंदर्भात १० ऑगस्ट रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. .

शहराच्या विकासासाठी मोक्याची जागा उपलब्ध होण्याची शक्यता

जमिनीच्या मूल्यांकनात प्रचलित बाजारभावाचा विचार करून ६५२५ चौ.मी. क्षेत्राची किंमत ३.९४ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयातील नझूल शाखेने तयार केलेला अहवाल आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, पुढील शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या क्षेत्रफळाची आणि कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेली ही जागा नगर परिषदेकडे आल्यास कामठी शहराच्या भविष्यातील विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मालमत्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या जागेचा नेमका उपयोग कशासाठी केला जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.