कामठी :- येणारा ईद व रक्षाबंधन सण तसेच आगामी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूरच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची सखोल तपासणी केली. अत्याधुनिक उपकरणे आणि श्वान पथकाच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या या शोध मोहिमेअंती संपूर्ण परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पथकाकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.
सणासुदीच्या काळात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी म्हणून ही सतर्कता मोहीम हाती घेण्यात आली होती.
बॉम्ब शोधक व नाशक पथक, नागपूरचे प्रभारी अधिकारी चेतन भोसले, अंमलदार संदीप, श्वान हस्तक पीसी निमेश आणि चालक पीसी सुरेश यांनी ही तपासणी मोहीम चोखपणे पार पाडली.
श्वान ‘जिम’कडून पाहणी
स्फोटके शोधण्यात तरबेज असलेल्या पथकातील ‘जिम’ नावाच्या श्वानाने संपूर्ण परिसर, व्हिजन पॅव्हेलियन, मुख्य प्रवेशद्वार, मार्ग आणि आजूबाजूच्या हिरवळीची काटेकोर तपासणी केली.
अत्याधुनिक उपकरणांचा वापर
पथकातील जवानांनी तपासणी मिरर व मेटल डिटेक्टर्सच्या साहाय्याने परिसरातील कानाकोपऱ्याची कसून पडताळणी केली.
दुपारी २:४० वाजता पार पडलेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद किंवा बॉम्बसदृश वस्तू मिळून आली नाही. संपूर्ण तपासणीनंतर पथकाने ड्रॅगन पॅलेसला सुरक्षिततेचा अधिकृत पंचनामा करून प्रमाणपत्र सुपूर्द केले.
नागपूर ग्रामीण व शहर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे सणासुदीच्या काळात भाविक व पर्यटकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





