spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

थकीत मालमत्ता करधारकांना मोठा दिलासा; ५० टक्के शास्ती माफीची योजना

– ३१ डिसेंबरपर्यंत थकीत कर भरल्यास मिळणार सवलत; १८,८२५ मालमत्ताधारकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कामठी :- थकीत मालमत्ता कराच्या ओझ्याखाली असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा देत नगर परिषद कामठीच्या कर विभागाने ५० टक्के शास्ती माफी योजना लागू केली आहे. या योजनेमुळे ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावर आकारण्यात आलेल्या दंडात निम्मी सवलत मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी कर भरण्याची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबर २०२६पर्यंत आपला थकीत मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत थकीत कर भरल्यास दंडाच्या ५० टक्के रकमेतून सवलत मिळणार असल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

नगर परिषदेकडील आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शहरात १८ हजार ८२५ मालमत्ता नोंदणीकृत असून, मालमत्ता कराची एकूण मागणी तब्बल ११ कोटी २६ लाख रुपयांच्या आसपास आहे. थकीत कराची वसुली वाढविण्यासोबतच नागरिकांवरील दंडाचा आर्थिक भार कमी करणे, हा या योजनेमागील दुहेरी उद्देश आहे.

दरम्यान, थकीत मालमत्ता कर वेळेत भरून उपलब्ध सवलतीचा लाभ घ्यावा आणि नगर परिषदेच्या महसूल वसुलीस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अजय अग्रवाल,उपाध्यक्ष सबा परवीन तौसिफ खान यांनी केले आहे. मुदत संपल्यानंतर शास्ती माफीचा लाभ मिळणार नसल्याने मालमत्ताधारकांनी विलंब न करता कराचा भरणा करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, उपाध्यक्षा सबा परवीन तौसीफ खान, माजी नगर परिषद अध्यक्ष मो शाहजहाँ शफाअत अन्सारी यांच्यासह कर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.