spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ

–  ३६ जिल्ह्यांत ७२ सेवादूतांची नियुक्ती

–  ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकाचेही प्रकाशन

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षणाच्या संधी तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)च्या ‘सेवादूत’ प्रकल्पाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सोमवारी सुरुवात झाली. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकाचेही राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सेवादूत प्रकल्पातील मिरा मोटे व सुनिल पवार या दोन सेवादूतांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे, आमदार निलम गोऱ्हे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज (भा.प्र.से.), इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे (भा.प्र.से.), ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, ‘वनार्टी’ प्रकल्प अधिकारी डॉ. चेतन बन्सोड यांची उपस्थिती होती. ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ७२ सेवादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांकडून यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजना आणि ‘वनार्टी’च्या उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देणे, ही सेवादूतांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. शासकीय योजनांची माहिती अनेकदा ग्रामीण व दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. ही माहितीची दरी भरून काढण्यासाठी सेवादूत ‘वनार्टी’ आणि लाभार्थी यांच्यातील प्रत्यक्ष दुवा म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे योजनांची माहिती मिळविण्यापासून अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध संधींचा लाभ घेण्यापर्यंत लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकात संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या माहिती पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सेवादूतांमुळे ‘वनार्टी’चा जनसंपर्क वाढणार : अतुल सावे

‘वनार्टी’च्या योजना आणि उपक्रमांचा थेट लाभ गरजू विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवादूत’ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शासकीय योजना उपलब्ध असूनही अनेकदा माहितीअभावी पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. ही दरी दूर करण्यासाठी ३६ जिल्ह्यांत नियुक्त होणारे ७२ सेवादूत योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच गरजू लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतील, असा विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केला. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करतानाच प्रत्यक्ष जनसंपर्कावरही भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सेवादूत करतील. ‘सेवादूत’ हे शासनाच्या योजना आणि लाभार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील. त्यामुळे ‘वनार्टी’च्या उपक्रमांना अधिक व्यापक लोकाभिमुखता मिळून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असेही अतुल सावे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.