spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भाजपा कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 

– भाजपा राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप 

काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. या विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र 2030 पर्यंत तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करू, असा निर्धार व्यक्त करत आणि महायुतीचे सरकार संकटांना सामोरे जात राज्यात परिवर्तन घडवेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला .

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन तसेच राज्य मंत्रिमंडळातील गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संजय सावकारे, अतुल सावे, माधुरी मिसाळ आदी मंत्री, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अंतिम भाषणात अराजकतेचे संकट आपल्याला समजावून सांगितले. आज तेच अराजकतेचे संकट त्याच संविधानाचे नाव घेऊन आपल्याविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न आहे. हे केवळ भाजपाच्या विरुद्ध नाही तर बृहद समाजाविरुद्ध याचा वापर होत आहे. नाव संविधानाचे घ्यायचे आणि संविधानाचे मूल्य पायदळी तुडवून अराजकता पसरवण्याचे काम चालले आहे. पण कोणी संविधानाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात जळाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

भारत आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. पण जगात अशा अनेक शक्ती आहेत ज्यांना ते पाहवत नाही. भारताला याच ठिकाणी रोखले नाही तर भारताला पुढे रोखता येणार नाही हे माहित असल्याने या शक्तींनी कार्यपद्धती बदलल्या आहेत. आज ते ज्यांचा वापर करताहेत त्यांच्यापैकी कदाचित पाच टक्केच लोकांना आपला वापर होत असल्याचे माहित आहे. पण 95 टक्के लोकांना आपला वापर होत असल्याचे माहित नसल्याने अजाणतेपणे अनेक लोक त्यांच्यासोबत जाताना दिसताहेत. न्यायालयातही जाता येणार नाही अशा प्रकारचे संशोधन संविधानात करून मूलभूत अधिकार संपवून टाकणाऱ्या काँग्रेस पार्टीने आता एक लाल संविधान हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्या लाल संविधानाचे कव्हर संविधानाचे आहे पण आत माओवादाचे लाल पुस्तक आहे. म्हणून राहुल गांधींना छात्रो की गुंज आठवायला लागली. मात्र ही छात्रो की गुंज नाही तर झूठ की गुंज आहे, असा भडीमार फडणवीस यांनी केला.

वंदे मातरमपेक्षा मातृसत्ता पद्धतीचे दुसरे कुठलेच प्रतीक नाही. जे गीत गात गात अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी फासावर गेले आणि गळ्यात फास होता तरी घाबरले नाहीत ते सुरु झाल्यावर सोनियाजींनी थयथयाट करत वंदे मातरम गीत थांबवायला लावल्याबद्दल फडणविस यांनी कडाडून टीका केली. 

महिला आरक्षणाचे मारेकरी कोणी असेल तर ते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे यूपीआयमधील पक्ष आहेत. त्यांनी या विधेयकाचा शिरच्छेद केला. पण माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. नरेंद्र मोदी एकदा जे ठरवतात ते करून दाखवतात. त्यामुळे आकाशपाताळ एक करून मोदी 2029 ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुढील लढाई फेक नरेटीव्हच्या विरोधात असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण सत्य सांगणे सुरू केले तेव्हा हे ओरडायला लागले की भगवीकरण चाललेय. यांच्या काळात एनसीआरटीच्या पुस्तकात आमच्या इतिहासात मोगलांना 13 पाने होती आणि आमच्या छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद होता. इतकी वर्षे आमचा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवला होता. पण मोदी सरकारने मुगलांना एका परिच्छेदात आणले आणि छत्रपती शिवराय आणि मराठ्यांच्या इतिहासाला 17 पाने दिली त्याक्षणी यांचा फेक नरेटिव्ह तुटला. यांचे पुढचे टार्गेट कुंभमेळा आहे. आता त्यांनी कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेतलाय. कुंभमेळ्यात जितक्या निविदा काढल्या त्या 20 ते 30 टक्क्यापर्यंत खाली गेल्या आहेत. एकेका निविदेत शंभर – शंभर कोटी रुपये वाचताहेत. चार टप्प्यात ऑडिट करत आहोत. मात्र खोटे बोला पण रेटून बोला, इतकेच विरोधकांना माहित असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.