निरीक्षणगृहातून पळालेला विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या हाती

0
19

कामठी :- नागपूर येथील शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहातून पळून गेलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेण्यात नवीन कामठी पोलिसांना यश आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बालकाचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

नवीन कामठी पोलीस ठाण्यात कलम १०३, ३४ भा.न्या.सं. अन्वये दाखल प्रकरणातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला पुढील कार्यवाहीसाठी पाटणकर चौक, नागपूर येथील शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून बालक निघून गेल्याने कपिलनगर पोलीस ठाण्यात कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत शोधमोहीम सुरू केली. उपलब्ध माहिती, तांत्रिक तपास व विविध शक्यता तपासत पोलिसांनी बालकाचा माग काढला. अखेर अथक प्रयत्नांनंतर बालकाचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश नालटे, पोलीस अंमलदार मोहम्मद नसीम आणि पोलीस अंमलदार नितेश नवघडे यांच्या पथकाने केली.

तपास पथकाच्या सतर्कतेचे कौतुक

विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेणे हे संवेदनशील व जबाबदारीचे काम असताना, नवीन कामठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि तपासातील बारकाई यामुळे बालकाचा शोध घेण्यात यश आले. या कामगिरीबद्दल तपास पथकाचे कौतुक होत आहे.