spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवापूर्वी कामठीतील रस्ते, वीज अन् स्वच्छतेचा ‘श्रीगणेशा’ करा!

– नगरसेविका दरकशा जेहरा कामरान आलम यांचे नगराध्यक्षला निवेदन

कामठी :- गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता स्वच्छता, रस्ते दुरुस्ती आणि विद्युत व्यवस्थेची तातडीने कामे पूर्ण करा, अशी जोरदार मागणी प्रभाग क्र 12 च्या नगरसेविका दरकशा जेहरा कामरान आलम तसेच लोकसेवक कामराण जाफरी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना तसेच नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष शहरातील मूलभूत सुविधांकडे वेधले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत भाविकांची मोठी वर्दळ असते. गणेश मंडप, सार्वजनिक कार्यक्रमांची ठिकाणे तसेच प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढत असल्याने स्वच्छता व्यवस्थेत कोणतीही कुचराई होऊ नये, यासाठी गणेश मंडप व परिसर, रस्ते आणि नाल्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, उत्सवाच्या काळात वाहतूक आणि भाविकांची ये-जा वाढणार आहे. त्यामुळे खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्त्यांचे पॅचिंग करण्यात यावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी इतर बांधकामाची कामेही पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अंधाराचे सावट दूर करण्याची मागणी

गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम सुरू राहतात. अशा वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था असणे आवश्यक असल्याने स्ट्रीट लाईट, विद्युत पोल आणि खराब झालेल्या पथदिव्यांची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख मार्ग आणि सार्वजनिक परिसर प्रकाशमान राहावा, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी स्वच्छता, रस्ते व विद्युत व्यवस्थेची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,” अशी भूमिका नगरसेविका दरकशा जेहरा कामरान आलम यांनी निवेदनातून मांडली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.