spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवात शांतता राखा, अफवांकडे दुर्लक्ष करा; तुमसरमध्ये सलोखा बैठक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा इशारा

हंसराज,भंडारा तुमसर :-  गणेशोत्सव आणि आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तुमसर पोलीस ठाण्यात  तालुकास्तरीय शांतता व जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशा सूचना देण्यात आल्या. उत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

यावेळी मार्गदर्शन करताना नूरुल हसन यांनी गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. उत्सवामध्ये डॉल्बी किंवा डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. वाहतुकीचे नियम पाळणे, अंमली पदार्थांचे सेवन टाळणे आणि कोणत्याही आक्षेपार्ह हालचाली आढळल्यास त्वरित ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका, असेही त्यांनी यावेळी बजावले. संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

या बैठकीला उपविभागीय दंडाधिकारी अंजली भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, ठाणेदार सुभाष बारसे, तहसीलदार उपेश अंबाडे, मुख्याधिकारी करण चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, खंडविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, आगार प्रमुख सचिन आगरकर, वैद्यकीय अधिकारी नितीन मिसुरकर, महावितरणचे सहाय्यक अभियंता अमित पटले यांची उपस्थिती होती. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी नितीन राठोड, विजय कसोधन, अभिजीत पाटील, किशोर घोडेस्वार आणि आकाशकुमार साखरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिजीत पाटील यांनी केले. आगामी काळात कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी शांततेत सण साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.