– १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी-एसडीओ संजय पवार
संदीप कांबळे, कामठी :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५८-कामठी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदार यादीतील नावे, समावेश किंवा नोंदींबाबत दावे-हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची पडताळणी करून त्रुटी आढळल्यास विहित मुदतीत दुरुस्ती अथवा हरकत नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.
मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार तयार करण्यात आलेली ही प्रारूप मतदार यादी संबंधित कार्यालयात तसेच मतदान केंद्रांवर कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत दावा, नावाच्या समावेशास हरकत किंवा मतदार नोंदणीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित नमुन्यात अर्ज सादर करता येणार आहे.
नाव नव्याने समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, मतदार यादीतील नावाबाबत हरकत किंवा वगळण्यासंदर्भात नमुना ७, तर नोंदीतील दुरुस्ती अथवा आवश्यक बदलांसाठी नमुना ८ दाखल करता येणार आहे.
विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. अशा पात्र नागरिकांच्या अर्जांचा संबंधित पात्रता निकषांनुसार विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.
दावे-हरकती संबंधित क्षेत्रातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालय कामठी/मौदा/नागपूर (ग्रामीण), मुख्याधिकारी नगर परिषद कामठी तसेच संबंधित नगरपंचायतींच्या कार्यालयात सादर करता येतील. तसेच संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडेही अर्ज देता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात त्रुटी राहू नये यासाठी नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता प्रारूप यादीची तपासणी करून आवश्यक असल्यास तातडीने दावा अथवा हरकत दाखल करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, संजय पवार,तहसिलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले आहे.





