संदीप कांबळे, कामठी :- कामठी शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाणी टाकी येथे सुरू असलेल्या विकासकामांची नगर परिषद अध्यक्ष अजय र अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची प्रगती, दर्जा व सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
पाणीपुरवठा व्यवस्थेशी निगडित हे काम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच निर्धारित वेळेत विकासकाम पूर्ण करून त्याचा लाभ नागरिकांना मिळावा, अशा स्पष्ट सूचना अध्यक्ष अग्रवाल यांनी संबंधित अधिकारी व कामगारांना दिल्या.
शहरातील नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यावर नगर परिषद प्रशासनाचा भर असून, सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता आणि प्रगती यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पाहणीदरम्यान नगरसेवक योगेश गायधने, माजी नगरसेवक कपिल गायधने, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोंडुलकर, ऐतेशाम अंसारी, सुनील पमनानी, अथर्व पिंगले, कमलेश शर्मा, शानू ग्रावकर, कृष्णा खंडेलवाल यांच्यासह संबंधित अधिकारी व कामगार उपस्थित होते.





