– नवेगावबांध पोलिसांची शांतता समितीची बैठक ; ठाणेदार अजित पाटील यांचे गणेश मंडळांना स्पष्ट आवाहन
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात शांतता समिती व पोलीस पाटलांची संयुक्त बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून तो कोणत्याही प्रकारच्या वादाला किंवा कटुतेला कारणीभूत ठरू नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन ठाणेदार अजित पाटील यांनी केले.
गणेशोत्सव मंडळांनी कानठाळ्या बसविणाऱ्या डीजेच्या आवाजाला आणि त्रासदायक लेझर लाईटला फाटा देत ढोल-ताशा, झांज, टाळ-मृदंग तसेच स्थानिक पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करावा. आपल्या गावची पारंपरिक संस्कृती, भजन-कीर्तन, लोककला आणि बंधुभावाचा जुना वारसा जपण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ठाणेदार पाटील यांनी स्पष्ट केले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. विसर्जनस्थळी पाण्याची खोली, प्रवाह आणि परिस्थितीचा अंदाज घेऊनच विसर्जन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात वैयक्तिक, सामाजिक किंवा राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. एका मंडळाचा उत्सव दुसऱ्या मंडळासाठी किंवा ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी घ्यावी. गावातील शांतता भंग होईल, अशा अफवा, वाद किंवा गैरसमजांना थारा देऊ नये, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विद्यार्थी आणि लहान मुलांना मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी. पोलिस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
“गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि सामाजिक एकतेचा पावन पर्व आहे. ६० ते ९०च्या दशकातील आपल्या भागातील पारंपरिक भजन, लोककला, ढोल-ताशा आणि बंधुभावाचा वारसा पुन्हा जिवंत करूया. डीजे-लेझरपेक्षा आपल्या मातीतील पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करा. प्रशासनाला सर्वांनी पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन ठाणेदार अजित पाटील यांनी केले.
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी आपल्या परिसरात सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद घटना, वाद किंवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पाडूया, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.





