– वर्षावास निमित्त धम्मदेशना
कामठी :- आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात तरुण पिढीसमोर शिक्षण, करिअर आणि रोजगारासह मानसिक ताण, अस्थिरता व दिशाहीनतेची अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत विवेक, प्रज्ञा, करुणा आणि आत्मपरीक्षणाची शिकवण देणारा बुद्धधम्म तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, असा संदेश ‘प्रबुद्ध हो मानव’ यांच्या वतीने आयोजित धम्मदेशना कार्यक्रमातून देण्यात आला. वर्षावास निमित्त ‘तरुण पिढीच्या विकासासाठी बुद्धधम्माची गरज’ या विषयावर रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, भिलगाव, कामठी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुण-तरुणी, उपासक-उपासिका व बुद्धधम्मप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात भंते शिवली, अध्यक्ष, महावरम ट्रस्ट तथा एम.ए. इन बुद्धिझम, थायलंड यांनी मुख्य मार्गदर्शन केले. त्यांनी बुद्धधम्माकडे केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता मानवी मन, दुःख, त्याची कारणे आणि जीवनातील समस्यांकडे विवेकपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण देणारे तत्त्वज्ञान म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. यावेळी मानसशास्त्र, कॉस्मोलॉजी आणि तत्त्वज्ञानाच्या संदर्भातून बुद्धविचारांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तरुणांनी ‘व्हॉट बुद्ध टॉट’ आणि ‘व्हाय बुद्धिझम इज ट्रू’ यांसारख्या पुस्तकांचे वाचन करून बुद्धधम्माचे विविध आयाम समजून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. विविध विषयांवरील पॉडकास्ट ऐकूनही ज्ञानाची व्याप्ती वाढविण्याचा संदेश देण्यात आला. “वाचा, विचार करा आणि प्रश्न विचारा; विवेकपूर्ण विचारांतूनच प्रबुद्ध मानवाची निर्मिती होऊ शकते,” असा प्रेरणादायी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तरुण पिढीने बुद्धधम्म, जीवनमूल्ये, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान तसेच आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना भन्ते शिवली यांनी अत्यंत समर्पक, तर्कशुद्ध आणि सोप्या भाषेत उत्तरे देत तरुणांचे शंकानिरसन केले. प्रश्नोत्तरांच्या या संवादामुळे कार्यक्रम अधिक वैचारिक आणि प्रेरणादायी ठरला. तरुणांनी केवळ ऐकणारे न राहता प्रश्न विचारून चिंतन करण्याची सवय लावावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी “प्रबुद्ध हो मानवा” या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.





