हंसराज,भंडारा कारधा :- भंडारा जिल्ह्यात अवैध रित्या गोमांसाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. कारधा पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत, गोमांसाची तस्करी करणारी एक महागडी कार पकडली. या कारवाईत पोलिसांनी ८० किलो गोमांसासह एकूण ५ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे अवैध मांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस हवालदार सिडाम यांना एका सिल्व्हर रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून (क्रमांक MH 31 CR 3984) गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मौजा कारधा येथे सदर संशयित वाहनाची झडती घेतली असता, गाडीच्या डिक्कीमध्ये तीन प्लास्टिक बकेट आणि एका लाल रंगाच्या कॅरेटमध्ये कापलेले गोमांस आढळून आले. सुमारे ८० किलो वजनाचे हे मांस २०० रुपये प्रति किलो दराने १६ हजार रुपयांचे असून, ५ लाख रुपयांची कार व इतर साहित्यासह पोलिसांनी ५,१६,५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान आरोपी चालक/मालक पोलिसांना चकवा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी कारधा पोलिसांनी फरार आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ६९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३२५, तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे सहकलम ५(क) आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जनावरांची अवैध कत्तल आणि मांस विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.
सदर धाडसी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस हवालदार सिडाम व त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फरार आरोपीचा शोध आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे अधिकारी अत्यंत गांभीर्याने करत आहेत.





