spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्यांशी दहा वेळा चर्चा करू, पण संजय राऊतांची नौटंकी चालू देणार नाही

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा इशारा

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सगळेच चुकीचे आणि एकटे जनाब आपणच बरोबर, अशा तोऱ्यात संजय राऊत वावरत आहेत. पुन्हा एकदा जनाधार निर्माण करणे शक्य नसल्याने स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही देशातल्या स्वायत्त संस्थांची बदनामी कशासाठी करताय. परंतु काळजी करू नका, महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत सातत्याने चर्चा करतात. गरज असेल तर दहा वेळा आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करू. परंतु तुमची राजकीय नौटंकी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ‘दिमागी नक्षल’ नावाची संकल्पना ही विद्यार्थ्यांसाठी नाही तर तुमच्यासारख्यांसाठी आणलेली आहे. तुमच्यासारखे लोक या देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. सरकार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत. पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर तुमची पोळी नाही तर तुमचेच तोंड भाजणार आहे, हे ‘दिमागी नक्षल’ जनाब संजय राऊतांनी लक्षात ठेवावे, असे बन यांनी सुनावले.

कोरोना काळात भाजपा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही राजकारण केले नाही. उलट, कोरोना काळात सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते होते. तुमचे मालक उद्धव ठाकरे घरात बसून होते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेत गेले, कोविडचा उपचार घेण्यासाठी ते खासगी हॉस्पिटलमध्ये नाही तर सरकारी रुग्णालयात गेले. तुमच्यासारखे फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये जाऊन आराम करत बसले नाहीत. कोरोना काळात तुम्ही मंदिरे बंद करून मदिरालये सुरू केली होती. कोविड बेड, खिचडी, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची संधीही तुम्ही आणि तुमच्या मालकांनी सोडली नाही. त्यामुळे कोरोना काळ आठवला तर तुमचे तोंडही काळे होईल, अशा शब्दात बन यांनी फटकारले.

बन पुढे म्हणाले, संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर जाणारच असतील तर त्यांनी तिथल्या संघ भूमीवर जाऊन माथा टेकत हिंदुत्ववादाचे पुन्हा एकदा धडे घेतले पाहिजेत. किमान दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ‘मी संविधानिक संस्थांना मानतो’, असे म्हणत ‘मी यापुढे निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, सुप्रीम कोर्टाचा अपमान करणार नाही’, अशी शपथ घेतली पाहिजे. पण ते ना संघभूमीवर जाणार ना दीक्षाभूमीवर. त्यांना फक्त ताजियाच्या मिरवणुकीत जायला आवडते.

उत्सवात आवाजाची मर्यादा ठेवली पाहिजे. पण मर्यादित आवाजात ढोल-ताशे किंवा डीजे वाजवण्यास आक्षेप घेण्याचे कारण नाही. डीजे किंवा ढोल-ताशांच्या बाबतीत पुणेकर, महाराष्ट्रातील जनता योग्य तो निर्णय घेईल. परंतु रोज सकाळी उठून तुम्ही जो भोंगा वाजवून ध्वनीप्रदूषण, राजकीय प्रदूषण आणि महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती रसातळाला नेण्याचे काम करताहात, तो सकाळचा भोंगा सगळ्यात आधी बंद व्हावा, अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून इच्छा आहे. तो बंद केलात तर महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार होतील, अशी खिल्ली बन यांनी उडवली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.