– मंगल चौरसिया यांची भूपेश बघेल यांच्याशी भेट
नागपूर :- कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते, समाजसेवक तथा सोनिया गांधी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल कुमार जाधव यांना विधानपरिषदेचे (MLC) सदस्यत्व देण्यात यावे, या मागणीसाठी सोनिया गांधी ब्रिगेडचे राष्ट्रीय संचालक मंगल चौरसिया यांनी छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकातील काँग्रेस संघटनात्मक व सामाजिक कार्यात अनिल कुमार जाधव यांच्या योगदानाची माहिती देत त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी करणारे निवेदनही सादर करण्यात आले. अनिल कुमार जाधव हे बिदर जिल्ह्यातील काँग्रेसचे सक्रिय युवा नेतृत्व म्हणून कार्यरत असून, सामाजिक प्रश्न तसेच युवकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असल्याचे मंगल चौरसिया यांनी यावेळी सांगितले. युवकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्या सोबतच जन सामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी जाधव यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगला जनाधार मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाशी सातत्याने जोडून राहून संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अशा युवा नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अनिल कुमार जाधव यांच्या कार्याचा विचार करून कर्नाटक राज्यातून त्यांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्वाची संधी द्यावी, अशी मागणी मंगल चौरसिया यांनी केली. या संदर्भात मंगल चौरसिया यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार याची भेट घेऊन अनिल कुमार जाधव यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला विधान परिषदेत संधी मिळाल्यास युवक, समाजातील वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मंगल चौरसिया यांनी सांगितले की, अनिल कुमार जाधव हे केवळ काँग्रेसचे युवा नेते नसून समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्या सोबतच युवकांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्वाची संधी द्यावी. बिदर जिल्ह्यासह कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्ते आणि युवकांमध्ये अनिल कुमार जाधव यांच्याबाबत सकारात्मक वातावरण असून, त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे ही मागणी करण्यात येत असल्याचे चौरसिया यांनी स्पष्ट केले. अनिल कुमार जाधव यांना MLC पदाची संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी पुढील काळातही चर्चा करून पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे मंगल चौरसिया यांनी सांगितले.





