– श्री संत गजानन महाराजांनी तारखेनुसार म्हणजे 8 सप्टेंबर 1910 गुरुवारला शेगांव येथील समाधी घेतली होती
आज ८ सप्टेंबर २०२६ रोजी, श्री संत गजानन महाराज, शेगाव यांचा ११६ वा, समाधी दिन आहे. श्री गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी शेगांव येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या समाधी दिनानिमित्त दरवर्षी शेगांव येथे मोठ्या श्रद्धेने पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
श्री संत गजानन महाराजांविषयी थोडक्यात माहिती :
शेगावचे श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, योगी आणि अध्यात्मिक विभूती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जन्मस्थळाबाबत आणि जन्म तारखेबाबत निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगांव येथे त्यांचे प्रथम प्रकट होणे मानले जाते. महाराजांची जीवनपद्धती अत्यंत साधी, अलिप्त आणि वैराग्यपूर्ण होती. ते दिगंबर अवस्थेत वावरत आणि कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुख – सुविधांना महत्त्व देत नसत. त्यांचा भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध असलेला मंत्र म्हणजे “गण गण गणात बोते”
हा मंत्र महाराजांच्या नामस्मरणाशी आणि त्यांच्या भक्तिपरंपरेशी घट्ट जोडला गेला आहे.
महाराजांनी आपल्या भक्तांना सेवा, भक्ती, सदाचार, परोपकार आणि ईश्वरावरील श्रद्धेचा मार्ग दाखविला. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग भक्तांच्या श्रद्धेत आजही चमत्कारिक म्हणून सांगितले जातात. त्यांच्या शिकवणीत मानवसेवा आणि भक्तीला विशेष महत्त्व होते. समाधीपूर्व संकेत श्री गजानन महाराजांनी आपल्या समाधीची जागा आणि वेळ याबाबत भक्तांना पूर्वसंकेत दिल्याची परंपरा आहे. त्यांच्या उपस्थितीत १९०८ मध्ये श्री गजानन महाराज संस्थानची स्थापना झाली. संस्थानच्या अधिकृत माहितीनुसार, महाराजांनी “या जागी राहील रे” असे सांगून पुढील काळात आपल्या समाधी स्थळाचा संकेत दिला होता. दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी, महाराजांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळावर पुढे मंदिर उभारण्यात आले आणि आज ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र बनले आहे.
आजचा ११६ वा समाधी दिन
१९१० पासून २०२६ पर्यंत ११६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आजचा दिवस श्रींच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण आहे.
देशभरातून भाविक शेगाव येथे येऊन समाधीचे दर्शन घेतात आणि “गण गण गणात बोते” या मंत्राचा जप करीत श्रींच्या चरणी नतमस्तक होतात.





