नागपूर :- महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन क्र. ५ मध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, झोन क्र. ५ च्या सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी झोन सभापती सीमा ढोमणे यांनी केली आहे.
वर्ष २०२६-२७ च्या झोन बजेटमध्ये मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ चे देयक दायित्व तब्बल ₹४ कोटी ६४ लक्ष १३ हजार दाखविण्यात आले आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त, झोन क्र. ५ यांनी सभापतींच्या समक्ष आतापर्यंत केवळ सुमारे ₹१ कोटी ५० लक्ष रुपयांचीच देयके सादर केली आहेत. मात्र 3 कोटींचे कामाचे विवरण सह बिलाचा हिशोबही देण्यात आला नाही. असा आरोप सभापती सीमा ढोमणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे..
याबाबत सभापतींनी सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार विचारणा केली असून, लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे . तसेच या दायित्वातील तफावतीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक व स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सीमा ढोमणे यांनी केला आहे. त्यामुळे ₹४ कोटी ६४ लक्ष १३ हजारांचे दाखविलेले दायित्व आणि प्रत्यक्ष सादर केलेली देयके यामध्ये एवढी मोठी तफावत का आहे, याबाबत संशय निर्माण झाला असून या प्रकरणात मोठा आर्थिक घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सीमा ढोमणे यांनी म्हटले आहे.
तसेच, आगामी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टॅंक उभारण्याच्या नियोजनाबाबत झोन समितीची बैठक घेऊन लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची मागणी सभापतींनी वारंवार केली होती. मात्र, कोणतीही चर्चा किंवा झोन समितीची बैठक न घेता ₹२१ लक्ष ९६ हजारांची निविदा काढण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
झोनमधील विकासकामे, देयक दायित्व, निविदा प्रक्रिया तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्यामुळे जनतेचे दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असे सीमा ढोमणे यांनी सांगितले.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल विभागीय चौकशी करून मागील आर्थिक वर्षातील ₹४ कोटी ६४ लक्ष १३ हजारांच्या देयक दायित्वाची तपासणी करावी, प्रत्यक्ष देयके व दाखविलेले दायित्व यातील तफावत स्पष्ट करावी तसेच कृत्रिम विसर्जन टॅंकच्या ₹२१ लक्ष ९६ हजारांच्या निविदेची प्रक्रिया तपासावी, अशी मागणी झोन सभापती सीमा ढोमणे यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.





