spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या दहाही झोन मध्ये दररोज प्रत्येकी दहा किलोमीटर अतिक्रमण निर्मुलन कारवाई

– नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार

– मनपा व पोलिसांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

नागपूर :- नागपूर शहरात वारंवार अतिक्रमण करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा केली जाणार आहे. वारंवार अतिक्रमण करून नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा (कॉग्नेजेबल ऑफेन्स) आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक (‘डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच मनपाच्या दहाही झोन मध्ये दररोज प्रत्येकी दहा किलोमीटर अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे अनधिकृत बाजार, फूटपाथवरील अतिक्रमण, अनधिकृत वेंडर, अतिक्रमण करणारे दुकानदार तसेच वाहन मॉडिफाय करून त्यावर व्यवसाय करणाऱ्यांच्याविरोधात धडक मोहीम राबवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीसह वारंवार होणारे अतिक्रमण याविषयावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेत व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस व मनपाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक रविवारी (ता.१३) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त  अंकित, मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, पोलीस विभागाचे सर्व उपायुक्त प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात पार्किंग आणि रस्ता चौकांसाठी एक उत्तम आणि प्रभावी ब्लू-प्रिंट तयार करण्यात यावी. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फूटपाथवरील सर्व अतिक्रमण हटवून ते पूर्णपणे मोकळे करण्यात यावे, रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात यावी, ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षा यांच्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्यात यावी. तसेच रस्त्यावर सिलिंडर ठेवून धोकादायक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अतिक्रमण विरोधी कारवाई करताना प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी सर्वप्रथम अनधिकृत वेंडर्सना नियमांनुसार नोटीस देण्यात यावी. त्यांच्या बैठका घेऊन त्यांना संबंधित कारवाईची सूचना द्यावी, कोणतीही कारवाई करताना संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याशी समन्वय साधावा, शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिघात असणारे अवैध पानठेले आणि अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचान्यांसाठी सुरक्षित व मोकळे मार्ग निर्माण व्हावा आणि शहरी शिस्त प्रस्थापित होऊन नागरिकांच्या जीवनमान अधिक उंचवावे याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन १०० डे’ ची संपूर्ण माहिती देताना स्पष्ट केले की, पोलिस आणि मनपा प्रशासन पूर्ण समन्वयाने ही संयुक्त कारवाई करणार आहेत. या मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील मोठे चौक, अवैध मार्केट, फुटपाथ आणि रस्त्यांवरील प्रमुख अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.