किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे बैल पोळा सणानिमित्त तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट ग्रामपंचायत दहेगावच्या सरपंच भारती संदिप आंबीलढुके होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लाकडी व मातीचे सजवलेले नंदी बैल व आकर्षक बैलगाडी आणली होती. बैलांना झूल, बाशिंग, घुंगरू माळा व फुलांनी सजवून त्यांची विधिवत पूजा व औक्षण करण्यात आले. शाळेचा परिसर फुगे व आंब्याच्या तोरणांनी सजवण्यात आला होता.
मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी विद्यार्थ्यांना बैल पोळा सणाचे महत्त्व, शेतीतील बैलांचे योगदान आणि शेतकरी-बैलाचे अतूट नाते याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद सुधीर खंडाईत , सुधीर कांबळे , राजेश रोहाड , सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबीलढुके, ज्योती आंबीलढुके, पुष्पा उके, उमेश उके, रंजना उके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





