– सोमलवाडा येथे भव्य भजन मेळावा व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
हंसराज,भंडारा सोमलवाडा :- विद्यार्थ्यांमध्ये उपजतच अनेक कलागुण असतात. शालेय स्तरापासूनच त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते कलेत पारंगत होतात. त्यामुळे जिल्ह्यातील कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सिद्धार्थ मेश्राम यांनी केले. सोमलवाडा येथे ‘अमर सांस्कृतिक कला निकेतन’ व ‘अमर कला सांस्कृतिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य भजन मेळावा व जाहीर सत्कार सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाहीर अंबादास नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रबोधनकार माधुरीताई घोडमारे, नाशिक चवरे, रमेश रहांगडाले, गंगाधर धोतरे, जयश्री सुखदेवे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेने गावात व्यसनमुक्ती व सामाजिक सलोख्याचे कार्य करणाऱ्या मोतीराम कडव, प्रकाश कुसराम, हरीदास चांदपुरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्रीकांत नागदेवे यांनी, तर सूत्रसंचालन योगराज बावने यांनी केले. आभार संस्था अध्यक्ष तेजस्वी मेश्राम यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





