किशोर साहू,मौदा :- जिल्हा परिषद शाळा तोंडली येथे जागतिक प्रथमोपचार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमोपचाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धूर्डे यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्त्व व आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. प्रथमोपचार पेटीतील विविध साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. तसेच त्या साहित्याची एक्सपायरी डेट तपासणे, साहित्याचा योग्य वापर करणे आणि प्रथमोपचार करताना आवश्यक ती काळजी घेणे याबाबत माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी स्वतः प्रथमोपचाराचे विविध प्रात्यक्षिके करून पाहिली. त्यामुळे केवळ माहिती न घेता प्रत्यक्ष कृतीतून प्रथमोपचाराच्या पद्धती विद्यार्थ्यांना समजल्या.आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचारानंतर रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास सहाय्यक शिक्षक निलेश जाधव तसेच संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखणे, योग्य प्रथमोपचार करणे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे याबाबत जागरूकता निर्माण झाली.





