spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणरायाच्या आगमनाने गावोगावी भक्तीमय वातावरण!

– ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; सार्वजनिक मंडळांतर्फे सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाची आतुरता अखेर संपली असून गणेश चतुर्थीनिमित्त नवेगावबांधसह परिसरातील गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, फुलांची आरास तसेच धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही पारंपरिक उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देण्याचा संकल्प केला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फुले, हार, सजावटीचे साहित्य आणि विद्युत रोषणाईच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह अधिक दिसून येत आहे.

दरम्यान, गणेशोत्सव शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारा ठरावा, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनिप्रदूषण टाळणे, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करणे, महिलांचा व मुलींचा सन्मान राखणे तसेच गणेशोत्सवात सामाजिक जनजागृतीचे संदेश देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

‘भक्तीबरोबर समाजभान’चा संदेश

यंदाचा गणेशोत्सव केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि व्यसनमुक्ती जनजागृती यांसारखे उपक्रम राबवून गणेश मंडळांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याने परिसर भारावून जाणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.