– ८७० एबीओ व लाइफ लाइनच्या सहकार्याने शेकडो नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ
कामठी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश यादवराव भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त एम. एम. रब्बानी शाळा, कामठी येथे मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व विविध रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव मोहम्मद इरशाद शेख व त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने आयोजित या शिबिराला ८७० एबीओ व लाइफ लाइनचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
कामठी शहर व परिसरातील गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्यतपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व वैद्यकीय सल्ला दिला.
शिबिरात फिजिशियन डॉ. तमीम फाजील, बालरोगतज्ज्ञ डॉ. मुझम्मील हसन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आमेरा पैकर, डॉ. मुदस्सर, डॉ. गोपाल अरोरा, डॉ. कृष्णा भोजवानी व डॉ. मनोज ओबेरॉय यांनी मोफत सेवा दिली. प्रसूती व स्त्रीरोग, नवजात शिशूंची देखभाल, बालकांच्या विकासाचे मूल्यमापन, लसीकरण, अस्थी व सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, दमा, क्षयरोग, त्वचारोग, मूत्रपिंड व यकृतविकार तसेच मणक्याच्या दुखण्यासह विविध आजारांवर रुग्णांना उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय रक्तातील साखर, रक्तदाब, ईसीजी व सिकलसेल तपासणी मोफत करण्यात आली. रुग्णांना आवश्यक औषधांचेही विनामूल्य वाटप करण्यात आले. नेत्रतपासणी करून गरजू नागरिकांना चष्मे वितरित करण्यात आले.
दरम्यान, कामठी नगर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक धीरज यादव, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, माजी नगरसेविका ममता कांबळे, कामठी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष इशरत खान, सातीका खांडेकर, साजिद अन्सारी, खरबी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कापसे, काँग्रेस नेत्या पूजा प्रीतम कापसे, अलंकार गजभिए, मीर आरिफ अली, राशिद अन्सारी, अभिषेक माहुले, संगीता नरड व साजिद कमाल अन्सारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेतल्या. मोहम्मद इरशाद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करून संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन केले.





