– ‘उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान शिक्षकांसह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांचा गौरव
नागपूर :- राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी मी व आमदार ॲड. अभिजीत वंजारी सातत्याने सभागृहात व सभागृहाबाहेत प्रयत्नरत आहोत. पुढे देखील शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न कण्याची ग्वाही विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली. समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केल्याने त्यांना नवीन ऊर्जा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तसेच गोविंद मैना फाउंडेशन यांच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय ना. बा. सपाटे व स्वर्गीय दत्तात्रेय मिर्झापुरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भंडारा येथे ‘सन्मान कर्तृत्वाचा – उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. हेमंत सेलिब्रेशन, भंडारा येथे रविवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागपूर, गाेंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणादरम्यान आमदार अडबाले बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले होते. आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सत्कारमूर्ती राजारामजी शुक्ला, होमराज कापगते तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) सोनटक्के, गोविंद मैना फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा अडबाले, सचिव राहूल अडबाले तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यात विदर्भ शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शुक्ला, विमाशि संघाचे भंडारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष होमराज कागपते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक अशा एकूण ११८ सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन विमाशि संघाचे भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे व नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे यांनी केले. शिक्षकांच्या कर्तृत्वाला समाजासमोर अधोरेखित करणारा हा सोहळा शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विशेष ठरला. उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक व मान्यवरांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, संचालन विमाशि संघ भंडाराचे कोषाध्यक्ष धिरज बांते, सुप्रिया टेंभुर्णे व शमशाद सय्यद यांनी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांचे वाचन गोंदिया जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र झाडे, नागपूर (ग्रा.) साठी जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, नागपूर महानगरसाठी कार्यवाह अविनाश बडे आणि भंडारा जिल्ह्यासाठी धिरज बांते, अनंत जायेभाये यांनी, तर आभारप्रदर्शन पुरुषोत्तम लांजेवार यांनी केले.
शिक्षक समाजाच्या प्रगतीचा पाया : अॅड. अभिजित वंजारी
उद्घाटनपर भाषणात आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व व्यक्त केले. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकवत नाही, तर भावी पिढीच्या विचारांना योग्य दिशा देतो. शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या पाठीशी संघटना आणि संस्था खंबीरपणे उभ्या राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





