– नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकावर गुन्हा; साऊंड सिस्टीम जप्त
– हॉस्पिटलजवळ तब्बल ८९.९ डेसिबल आवाजाची नोंद
हंसराज,भंडारा तुमसर :- जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाची पायमल्ली करत गणेश आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश व कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डॉल्बी डीजे वाजविणाऱ्या संचालकावर तुमसर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टीम जप्त केली असून डीजे मालकाविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हॉस्पिटलजवळ मोजली आवाजाची तीव्रता
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास तुमसर येथे श्री गणेश आगमन मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक कोडवानी हॉस्पिटलजवळ पोहोचली असता तेथे अत्यंत मोठ्या व कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सिस्टीम सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच तुमसर पोलीस ठाण्याच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने सोबत आणलेल्या ‘कॅन्सीलो’ कंपनीच्या आधुनिक साऊंड लेव्हल मीटरच्या साह्याने आवाजाची तीव्रता मोजली असता, मशीनमध्ये ध्वनीची पातळी तब्बल ८९.९ डीबी (L-Aeq 89.9 dB) आढळून आली. ही पातळी शासन निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने डीजे संचालकाकडून ध्वनी प्रदूषण नियमांचे सरळ उल्लंघन होत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी मीठेवानी येथील एका २४ वर्षीय डॉल्बी डीजे मालकावर तुमसर पोलिसांनी कारवाई केली. याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून संपूर्ण डॉल्बी साऊंड सिस्टीम जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, सण-उत्सवादरम्यान कर्णकर्कश साऊंड सिस्टीम व वाहनांवर बंदी घालण्याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते.
सदर कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक बाळासाहेब आढाव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, पोलीस अंमलदार नामदेव बळदे, चेतन कुरंजेकर, तिलक चौधरी व महिला पोलीस अंमलदार प्रीती कडव यांच्या पथकाने केली.
पोलिसांचे नागरिकांना व मंडळांना आवाहन
“ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, चिमुकले आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात शांततेत साजरा करावा. कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये; नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— पोलीस ठाणे, तुमसर





