– अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा
जालना :- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, मनोज जरांगे यांना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांना मुंबई दौऱ्यासाठी SPU सुरक्षा देण्यात आली आहे. SPU अर्थात ज्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलीस कॉन्स्टेबल सतत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणार आहे. अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत मनोज जरांगे यांना ही विशेष सुरक्षा असणार आहे. सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा विभागाचे एक अधिकारी आजपासून आणि एक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
जरांगे आज मुंबईसाठी होणार रवाना
मनोज जरांगे पाटील उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. मनोज जरांगे आज (15 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली असून रविवारी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मनोज जरांगेंच्यावतीनं तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज
मनोज जरांगे यांचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज केला आहे. 50 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या तिसऱ्या अर्जातून जरांगेंनी केली आहे. आम्ही सगळ्या नियम आणि अटी पाळू, १८ तारखेला दिलेल्या वेळेत आम्ही आंदोलन करू असंही नव्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जर आज दुपार पर्यंत परवानगी दिली नाही तर मनोज जरांगे दुपारी कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी का नाकारली?
गेल्या वर्षीचा अनुभव : गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5,000 वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते.
गणेशोत्सवाचा काळ : 14 सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते.
आझाद मैदानावरील जागेची मर्यादा : आझाद मैदानातील 7,000 चौरस मीटर जागेत नियम 2025 नुसार कमाल 5,000 आंदोलकच समावू शकतात. मात्र जरांगेंनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक आणि रुग्ण सेवा : लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये (जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल), न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.





