-गुन्हे शाखा युनिट-६ची कारवाई; वाहनचोराला अटक, २.४० लाखांच्या तीन दुचाकी जप्त
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीसह नागपूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्या मध्य प्रदेशात विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६च्या पथकाने अटक केली. आशुतोष रतिराम यादव (वय १९, रा. सुनवारा, तहसील धनोरा, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन ॲक्सेस दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे जुनी कामठी, राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांतील वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी सुरू असताना पोलिस कर्मचारी सुनील यादव आणि दिनेश महल्ले यांना खबऱ्यामार्फत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी आशुतोष यादव याला ताब्यात घेत चौकशी केली.
चौकशीत आरोपीने नागपूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्या मध्य प्रदेशात नेऊन विकल्याची माहिती दिली. तसेच जुनी कामठी, राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही दुचाकी चोरी केल्याचे त्याने सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी तीन ॲक्सेस दुचाकी जप्त केल्या. त्यामध्ये निळ्या रंगाची ॲक्सेस (एमएच ४० डीएफ ५३३८), निळ्या रंगाची ॲक्सेस (एमएच ४० डीजी २६०३) आणि पांढऱ्या रंगाची ॲक्सेस (एमएच ३७ एजे २७७४) यांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे.या कारवाईमुळे जुनी कामठी पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचा गुन्हा बीएनएस कलम ३०५(बी), तर राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांतील गुन्हे बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणातील बलराम दुबे (वय १९, रा. शुक्ला नगर, जबलपूर, मध्य प्रदेश) हा फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. चोरीच्या वाहनांची मध्य प्रदेशातील विक्री साखळी आणि अन्य सहभागींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुनील यादव आणि दिनेश महल्ले यांनी केली.





