नाशिक :- नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, छायाचित्र आणि पदाचा गैरवापर करून परदेशी क्रमांकावरून संदेश पाठवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा संशयास्पद संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील +66 92 455 6074 या क्रमांकाचा वापर करून हे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटवर व्यावसायिक खाते असे दर्शविण्यात येत आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यात आले असून, त्यांच्या पदाचा गैरवापर करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या बनावट अकाउंटवरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या संदेशांद्वारे संबंधित व्यक्तींशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार सायबर फसवणुकीच्या उद्देशाने केला जात आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, या अकाउंटमागे नेमका कोणाचा हात आहे आणि संपर्क साधण्यामागील उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या बनावट अकाउंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित परदेशी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, फोनला अथवा अन्य स्वरूपातील संपर्काला प्रतिसाद देऊ नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या क्रमांकावर कोणतीही वैयक्तिक माहिती , महत्त्वाची कागदपत्रे , ओटीपी , बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
नागरिकांना एखाद्या संशयास्पद क्रमांकावरून संदेश किंवा फोन आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बनावट अकाउंटद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या बनावट व्हॉट्सॲप अकाउंटबाबत पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





