spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

5 हजार कोटींचे मालक आमदार पराग शाह रस्त्यावर भिकारी बनून का फिरले?

मुंबई :- महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे पराग शाह अचानक भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरताना दिसले आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घाटकोपर पूर्व मतदारसंघातील रस्त्यांवर त्यांनी आपली ओळख लपवून एक दिवस सामान्य भिकाऱ्याप्रमाणे घालवला. गुरूंच्या आदेशानुसार केलेल्या या प्रयोगातून पैसा आणि पद नसताना समाजाचा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शाह यांनी सांगितले. या अनुभवात काहींनी त्यांना पैसे दिले, तर एका समोसेवाल्याने पैसे न घेता त्यांना समोसा दिला.

आमदार पराग शाह रस्त्यावर भिकारी बनून का फिरले?  

मुंबईतील घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह यांनी आपली ओळख लपवून भिकाऱ्याचा वेश धारण केला आणि आपल्या मतदारसंघातील रस्त्यांवर काही काळ सामान्य भिकाऱ्याप्रमाणे वावरले. या वेळी त्यांनी नेहमीची सुरक्षा, महागड्या गाड्या आणि आमदार म्हणून मिळणारा मान-सन्मान बाजूला ठेवला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पराग शाह यांच्या म्हणण्यानूसार, त्यांच्या जैन आध्यात्मिक गुरूंनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याच्या वेशात राहून जीवनाचा वेगळा अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी आपला वेष आणि चेहरा बदलला आणि घाटकोपरच्या रस्त्यांवर सामान्य व्यक्तीप्रमाणे वेळ घालवला. पैसा, पद आणि ओळख नसताना समाज एखाद्या व्यक्तीकडे कसा पाहतो, हे प्रत्यक्ष अनुभवणे हा यामागील उद्देश होतो, असं पराग शाह यांनी सांगितले.

पराग शाह यांना लोकांनी ओळखलेच नाही-  

भिकाऱ्याच्या वेशात असताना बहुतांश लोकांना ते पराग शाह असल्याचे समजले नाही. आमदार म्हणून लोक भेटण्यासाठी रांगा लावतात, मात्र ओळख लपवल्यानंतर काही जणांनी त्यांना दूर जाण्यास सांगितले, तर काही जण मदतीसाठी पुढे आले. या अनुभवातून समाजातील पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचा दृष्टिकोन वेगळा असतो, अशी जाणीव झाल्याचे पराग शाह यांनी सांगितले. स्वतःची ओळख, पैसा आणि राजकीय पद बाजूला ठेवल्यावर लोकांचा प्रतिसाद कसा बदलतो, हे त्यांनी अनुभवण्याचा प्रयत्न केला. पराग शाह यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रयोगाचे काही जण कौतुक करत आहेत, तर काही जण याकडे सामाजिक प्रयोग म्हणून पाहत आहेत.

कोण आहेत पराग शाह?

पराग शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. पराग शाह राजकारणासोबतच रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित आहेत. राज्यातील विविध पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शाह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये घाटकोपर पूर्वमधून प्रथमच विजयी झालेल्या पराग शाह यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पराग शाह गेल्या वेळी 53,319 मतांनी विजयी झाले होते. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शाह यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांची एकूण संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती 550.62 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग शाह हे 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 132 मधून विजयी झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.