– FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई :- दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला असून, या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे , अभिनेता सूरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांची नावे असल्याचा दावा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “तुम्हाला माहित आहे की, या संपूर्ण विषयावर मी कधीही बोललो नाही. मी माझं मत व्यक्त केलं नाही, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. एका मुलीच्या चारित्र्याविषयीचा हा विषय आहे. तिच्या कुटुंबावर कोसळलेला आघात आहे. तिचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वारंवार केला. मुंबई पोलिसांच्या इंटिग्रेटीवर शंका घेता येणार नाही.”
आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध नाही
“महाराष्ट्रात आता शिवसेनेचं सरकार नाहीय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसून देवेंद्र फडणवीस आहेत. गृहमंत्रीही तेच आहेत. त्यांच्याच काळात या प्रकरणाचा तपास पूर्ण होकर क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध नाही, असं सांगण्यात आलं. विरोधकांचं सरकार असताना मुंबई पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे जे आरोप विरोधकांनी केले त्यादिशेने तपास केला. आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही, असा कोणताही पुरावा नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
ठाकरे कुटुंबाला डाग लावण्याचा दिल्लीचा प्रयत्न
विरोधकांवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “राजकीय हेतुने प्रेरित पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा केली जाते आणि त्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहे. हा आता राजकीय आखाडा झाला आहे. या राज्याच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. हे षडयंत्र आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्टपणे सांगितलं की, जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत कोणीही आरोपी आहे असं गृहित धरू नका. पण तरीही मी कालपासून पाहतोय की काही मीडियाची लोक मोठमोठ्याने ओरडत असून संशय निर्माण केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र असून राजकीय कारस्थान आहे. ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रात स्थान आहे, मराठी माणसाच्या हृदयात जे स्थान आहे त्याला डाग लावण्याचा प्रयत्न दिल्लीच्या माध्यमातून सुरू आहे. मी इतकंच सांगेन याही प्रकरणात बदनामीच्या मोहिमेविरोधात आम्ही लढत राहू,” असे त्यांनी म्हटले.





