नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य महोत्सव’ संकल्पनेला साजेसा आणि उत्साही प्रतिसाद देत महावितरणने स्तुत्य आणि भव्य ‘ऊर्जा प्रबोधन मोहीम’ हाती घेतली आहे. ‘हरित ऊर्जा आणि विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल’ या प्रेरक ध्येयाने प्रेरित होऊन 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येत आहे.
या अभियानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून महावितरणचे शेकडो अभियंते सामाजिक बांधिलकी जपत थेट मैदानात उतरले आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतची संपूर्ण टीम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, वीज बचत आणि सुरक्षिततेचे मोलाचे धडे देत आहे. मंगळवारी नागपुरातील सीएमएस महाविद्यालय आणि अयोध्या नगर येथील श्री गजानन विद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे उत्साहवर्धक प्रबोधन सत्र पार पडले.
विद्यार्थी व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, ई-व्हेंकिल धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि ‘गो ग्रीन’ कागदविरहित कारभार यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सोबतच दैनंदिन आयुष्यात वीज अपघातांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपायांवरही मार्गदर्शन केले जात आहे.
केवळ शाळा-महाविद्यालयेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातूनही ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उत्सवासाठी केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ELCB (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) उपकरण अनिवार्यपणे लावावे, ऊर्जेची बचत करण्यासाठी देखाव्यांमध्ये एलईडी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हरित ऊर्जेचा संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे उभारावेत, असे नम्र आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. या राज्य महोत्सवात सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेचा हा मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आग्रही आवाहन महावितरणने केले आहे.





