– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
– सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंज, यात्रा, स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, जनसेवक महाकुंभचे आयोजन
यवतमाळ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राज्यात “सेवा संकल्प अभियान” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने आज गुरुवारपासून जिल्ह्यात हा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
या अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी बुधवारी महसूल भवनात पूर्वतयारीची बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, प्रकल्प संचालक आनंदराव इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सुखदेव राठोड, सहायक आयुक्त मंगला मून, सहायक आयुक्त सुशील उचले, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या सेवा सेतू अभियानांतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर शिबीर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे थेट लाभ पात्रतेनुसार नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यात एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सेवा सेतू अभियान कालावधीत वन हक्क समित्यांची बैठक घेवून वन हक्क दावे मंजूर करणे व मंजूर वन हक्क दाव्यांनुसार अधिकार अभिलेख तयार करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
याशिवाय सेवा सेतू अभियानांतर्गत तालुकास्तरावर शिबीर आयोजित करुन महसूल विभागाद्वारे विविध दाखले, प्रमाणपत्र इ. सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यवसायिक व कॉर्पोरेट इनोव्हेटर्स व ग्रामीण भागातील नविन समाधाने विकसित करणाऱ्या लोकांना जोडण्यासाठी राज्यस्तरीय ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खाजगी कंपन्या यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. याद्वारे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट इनोव्हेटर्सची निवड केली जाणार आहे.
यासोबतच, प्रत्येक गावात व वार्डात सेवा योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, अनाथालय व वृद्धाश्रम भेट, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता ही सेवा, आरोग्य तपासणी शिबिर, एक गाव दत्तक घ्या सेवा कार्य, योग आणि ध्यान सत्र, प्लास्टिक मुक्ती जागरूकता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग सत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता इत्यादी कार्यक्रम घेतले जाणार आहे.
या अभियानांतर्गत विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, सकारात्मक बदलाच्या यशोगाथा, मानवी रांगोळी, कला पथक व नाट्य पथकाद्वारे जनजागृती, जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा तसेच ग्रामपंचायत स्तरापासून ते संसदेच्या स्तरापर्यंत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा महाकुंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, विभागस्तरावर आयुक्त आणि राज्यस्तरावर मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासह समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिले.





