– ८९ कृत्रिम तलावात २ हजार ८० श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन
नागपूर :- शहरात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर श्रीगणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. एक व दीड दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे तयार करण्यात आलेल्या ८९ कृत्रिम तलावांमध्ये २ हजार ७९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात २ हजार १० मातीच्या व ६९ पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या कृत्रिम तलावांची माहिती मिळविण्यासाठी मनपाने दिलेल्या क्यूआर आणि संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात एकूण ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती टप्याटप्याने केली जाणार आहे. यातील काही विसर्जन कुंडांचे लोकार्पण महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते फुटाळा तलाव परिसरात करण्यात आले आहे. शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४१९ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागातील कच्छी विसा व कोराडी येथे मोठे तलाव बांधले आहेत.
मनपाच्या दहाही झोन स्तरावर नागरिकांनी आपल्या जवळील मनपाच्या कृत्रिम तलावावर श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले. एक व दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी लक्ष्मीनगर झोनमध्ये १० कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, यात पहिल्या व दीड दिवसात १ हजार ७७ मातीच्या व २३ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर धरमपेठ झोन अंतर्गत ३७ तलाव असून, या कृत्रिम तलावात ६६७ मातीच्या व २४ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. हनुमाननगर झोन येथे २ कृत्रिम टाकावे असून, कृत्रिम तलावात १० मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत ३ कृत्रिम तलाव असून, कृत्रिम तलावात ४८ मातीच्या मूर्तींचे आणि ५ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत असलेल्या २ कृत्रिम तलावांमध्ये १९६ मातीच्या मूर्तींचे आणि १४ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गांधीबाग झोनमध्ये २२ कृत्रिम तलाव असून, या कृत्रिम तलावांमध्ये ८ मातीच्या तर ३ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सतरंजीपुरा येथे १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. तर मंगळवारी झोनमध्ये १२ कृत्रिम तलावात ४ मातीच्या मूर्तींचे विसर्जन झाले आहे.
नागरिकांसाठी क्यूआर व संकेतस्थळ
शहरात कृत्रिम तलाव कुठे आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कृत्रिम विसर्जन तलाव शोधा, यासाठी मनपाने क्यूआर कोड आणि संकेतस्थळ https://ganpati-zone-map.emergent.host तयार केला आहे. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर आपल्या घराजवळ कुठे कृत्रिम तलाव आहे. याची माहिती झोननिहाय मिळेल तसेच तेथे जाण्यासाठी दिशादर्शक गुगल मॅप सुद्धा उपलब्ध राहणार आहे. क्यूआर कोड मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या कृत्रिम तलावांचा उपयोग करून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी करण्यास सहकार्य करावे.
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे : महापौर
महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचा आगमन झाले आहे. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन तलाव, विहिरी किंवा नाल्यात करण्याऐवजी मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे. यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होणार नाही. यासाठी डीजीटल पद्धतीने नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती सुद्धा मिळत आहे.





