– आजाद समाज पार्टीच्या पूर्व विदर्भ टीमचे आंदोलन; चंद्रशेखर आजाद यांना Z+ सुरक्षा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) पूर्व विदर्भ टीमच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या ताफ्यावर बाराबंकी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी संविधान चौक, नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान हल्ल्याचा निषेध नोंदवत खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. खासदार चंद्रशेखर आजाद हे बाराबंकी येथे जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे नमूद करत आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलने व निवेदने देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. आंदोलना दरम्यान नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देण्यात आले. खासदार चंद्रशेखर आजाद हे राष्ट्रीय पातळीवरील लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून त्यांना Z+ सुरक्षा द्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात पक्षाचे महाराष्ट्र महासचिव डॉ. जे.बी.रामटेके, विदर्भ अध्यक्ष (पूर्व) नितीन नागदेवते, सुशीलकुमार ढोलेकर, खुशी कांबळे, संदीप उके, सलमान पठाण, निलेश राऊत, समीर सेलेकर, यश खोंडे, स्वप्नील घरडे, नितेश तांबे, सचिन मेश्राम, मृणाली रामटेके, पास्टर विकास मेश्राम, प्रदीप मिसाळ, संजय वाघ, सारंग देशकर, पिटर खंडेराव, राहुल साहू यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी घटनेचा निषेध नोंदवत विविध घोषणा दिल्या. ‘जय भीम, जय भारत, जय संविधान’ अशा घोषणांनी संविधान चौक परिसर दुमदुमून गेला. आंदोलनाच्या माध्यमातून खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.





