spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासण्याचे आवाहन

चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, तसेच मतदार यादीतील नोंदी अचूक आहेत किंवा नाहीत, याची नागरिकांनी तपासणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी नागरिकांना electoralsearch.eci.gov.in तसेच voters.eci.gov.in या अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल. मतदार आपला मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC), वैयक्तिक तपशील अथवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे नाव शोधू शकतात.

मतदारांनी काय तपासावे?

नागरिकांनी प्रारूप मतदार यादीमध्ये पुढील बाबी तपासाव्यात—

आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे का?

नाव, वय, लिंग व इतर तपशील योग्य आहेत का?

पत्ता व मतदारसंघाची माहिती अचूक आहे का?

कुटुंबातील पात्र मतदारांची नावे यादीत आहेत का?

मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी आढळत नाहीत ना?

नाव नसल्यास किंवा नोंदीमध्ये त्रुटी असल्यास

पात्र नागरिकाचे नाव प्रारूप मतदार यादीत नसल्यास नाव नोंदणीसाठी नमुना क्र. ६ द्वारे अर्ज करता येतो. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती, बदल किंवा अन्य आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी केंद्राशी संपर्क साधता येईल. भारत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतदार यादीतील नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ वापरला जातो.

विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पात्र नागरिकांसाठी वर्षातील चार पात्रता दिनांकांची तरतूद आहे.

चंद्रपूर शहरातील नागरिकांना मतदार यादी तपासणीसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये व मतदार नोंदणी केंद्रांमार्फत विशेष जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव व मतदार यादीतील तपशील तपासावेत.

SIR संदर्भातील अधिकृत माहितीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर SIR २०२६, प्रारूप मतदार यादी, दावे व हरकती, मदत केंद्रांची माहिती आणि इतर आवश्यक सूचना उपलब्ध आहेत. SIR संदर्भातील शंका किंवा अधिक माहितीसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक १९५० वर संपर्क साधता येईल.

“मतदार यादीत आपले नाव आहे का? आजच तपासा!”

आपले नाव तपासा • माहिती अचूक आहे का ते पाहा • आवश्यक असल्यास नियमानुसार अर्ज करा

— चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.