– ९२ कृत्रिम तलावात ७०७ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन
नागपूर :- शहरात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर श्रीगणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तीन दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे तयार करण्यात आलेल्या ९२ कृत्रिम तलावांमध्ये ७०७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात ६७४ मातीच्या व ३३ पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या कृत्रिम तलावांची माहिती मिळविण्यासाठी मनपाने दिलेल्या क्यूआर आणि संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात एकूण ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती टप्याटप्याने केली जाणार आहे. शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४१९ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागातील कच्छी विसा व कोराडी येथे मोठे तलाव बांधले आहेत.
मनपाच्या दहाही झोन स्तरावर नागरिकांनी आपल्या जवळील मनपाच्या कृत्रिम तलावावर श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले. एक व दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी लक्ष्मीनगर झोनमध्ये १० कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, यात तीन दिवसीय ५३ मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. तर धरमपेठ झोन अंतर्गत ३७ तलाव असून, या कृत्रिम तलावात ४१२ मातीच्या व १९ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. हनुमाननगर झोन येथे ५ कृत्रिम तलाव असून, कृत्रिम तलावात १४ मातीच्या व २ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत ३ कृत्रिम तलाव असून, कृत्रिम तलावात ११३ मातीच्या मूर्तींचे आणि १२ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत असलेल्या २ कृत्रिम तलावांमध्ये ६८ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गांधीबाग झोनमध्ये २२ कृत्रिम तलाव असून, या कृत्रिम तलावांमध्ये ४ मातीच्या विसर्जन करण्यात आले आहे. सतरंजीपुरा येथे १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. येथील कृत्रिम तलावात ५ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर मंगळवारी झोनमध्ये १२ कृत्रिम तलावात ५ मातीच्या मूर्तींचे विसर्जन झाले आहे.
विविध संस्थांचे सहकार्य
विसर्जनावेळी नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आणि योग्य माहिती देण्यासाठी ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि रामदेवबाबा विद्यापीठाचे स्वयंसेवक विद्यार्थी, तेजस्विनी महिला मंच यांचे स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवीत आहेत.
नागरिकांसाठी क्यूआर व संकेतस्थळ
शहरात कृत्रिम तलाव कुठे आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कृत्रिम विसर्जन तलाव शोधा, यासाठी मनपाने क्यूआर कोड आणि संकेतस्थळ https://ganpati-zone-map.emergent.host तयार केला आहे. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर आपल्या घराजवळ कुठे कृत्रिम तलाव आहे. याची माहिती झोननिहाय मिळेल तसेच तेथे जाण्यासाठी दिशादर्शक गुगल मॅप सुद्धा उपलब्ध राहणार आहे. क्यूआर कोड मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या कृत्रिम तलावांचा उपयोग करून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी करण्यास सहकार्य करावे.





