नागपूर :- हिंगणा व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक उत्तम, अखंडित आणि विश्वासार्ह वीजसेवा मिळावी या उद्देशाने बुटीबोरी विभागाअंतर्गत ‘एडीबी’ (ADB) योजनेतून मंजूर झालेल्या 33/11 केव्ही हिंगणा पीएचसी (PHC) उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 17 सप्टेंबर) पार पडला. हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या शुभहस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणा नगरपंचायतीच्या अध्यक्षा लताताई गौतम डार्विन होत्या. तर महावितरण, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उप्स्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर यांनी या प्रकल्पाची पार्श्वभूमी, तांत्रिक बाबी आणि उपकेंद्राची कार्यक्षमता यावर प्रकाश टाकला. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता राजेश नाईक म्हणाले की, “वाढत्या नागरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे हिंगणा परिसरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रामुळे परिसरातील विजेचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच ग्राहकांना अधिक सक्षम, स्थिर, गुणवत्तापूर्ण आणि विनाखंड वीजपुरवठा मिळण्यास मोठी मदत होईल.”
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद नागपूरच्या माजी सभापती उज्वला बोढारे, हिंगणा नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा रुपाली अजयराव बुधे, जिल्हा परिषद नागपूरचे माजी विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांच्यासह महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक गाणार, हिंगणा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंधये यांच्यासह पायाभूत आराखडा नागपूर परिमंडळातील सर्व संबंधित अधिकारी, बुटीबोरी विभागाअंतर्गत येणारे अधिकारी व कर्मचारी, हिंगणा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.





