spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर जिल्ह्याची सौरक्रांती: 8 हजारांहून अधिक कृषीपंपांना आता दिवसा हक्काची वीज; ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ठरतेय वरदान!

नागपूर :- ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवा तांत्रिक बळकटपणा आणि आर्थिक समृद्धी देण्यासाठी राज्य सरकारने महावितरणच्या माध्यमातून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ नागपूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडवत आहे. या दूरदर्शी योजनेमुळे जिल्ह्यातील 8,199 शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी रात्रीच्या कष्टापासून व अपघाताच्या धोक्यापासून कायमची मुक्ती मिळाली असून, दिवसा अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होत आहे.

महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडळांतर्गत येणाऱ्या उमरेड तालुक्यातील उडसा येथे 33/11 केव्ही उपकेंद्रासाठी ‘मेसर्स सुराणा इलेक्ट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारे उभारण्यात आलेला 5 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आला आहे. यापूर्वी येनवा उपकेंद्राअंतर्गत येरला धोटे येथे 7 मेगावॉट (4 व 3 मेगावॉट), कचारी सावंगा येथे 4 मेगावॉट, तोंडाखैरी येथे 3 मेगावॉट आणि सावरगाव येथे 8 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाले आहेत. नवीन उडसा प्रकल्पामुळे नागपूर ग्रामीण मंडळाची एकूण सौर वीज निर्मिती क्षमता तब्बल 27 मेगावॉटवर पोहोचली असून, 8 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दिवसा विजेचा मार्ग सुकर झाला आहे.

पूर्वी ग्रामीण भागात बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विषारी साप, विंचू आणि हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीखाली जीव मुठीत धरून अंधारात काम करावे लागत होते. मात्र, या सौर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची या त्रासातून पूर्णपणे सुटका झाली आहे. आता दिवसा नियमित वीज उपलब्ध होत असल्यामुळे पिकांना खते व पाणी देणे सोपे झाले असून ऐन वेळेवर होणारे पिकांचे नुकसानही टळत आहे.

स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या या हरित ऊर्जेमुळे पारंपरिक ग्रीडवरील ताण कमी झाला आहे, तसेच पारेषण आणि वितरणातील तांत्रिक नुकसान टळून वीज पुरवठ्याची गुणवत्ता वाढली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून मार्च 2027 पर्यंत राज्यातील 100 टक्के कृषी सिंचन सौरऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या मोहिमेला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे आणि नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे यांच्या सक्षम नेतृत्वात जिल्ह्यात सौर प्रकल्पांची कामे अत्यंत वेगाने पूर्ण केली जात आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.