spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्करोग जनजागृती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन व सेंट्रल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; कर्करोगाची लक्षणे, कारणे व आधुनिक उपचारपद्धतींबाबत डॉ. मुर्तुजा बोहरा यांचे मार्गदर्शन

नागपूर :- समाजात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कर्करोगा बाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन (IMPF) आणि सेंट्रल हॉस्पिटल, मोमिनपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कर्करोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिला व पुरुष नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे (NCI) प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुर्तुजा बोहरा उपस्थित होते. त्यांनी स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग तसेच इतर विविध प्रकारच्या कर्करोगांची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि आधुनिक उपचारपद्धती याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. डॉ. बोहरा यांनी कर्करोगा विषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली. कर्करोगाची लक्षणे वेळेत ओळखून योग्य वेळी उपचार घेतल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगा बाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजांवरही त्यांनी प्रकाश टाकत त्यांचे निराकरण केले. तंबाखू, धूम्रपान, गुटखा – खर्रा आणि लठ्ठपणा हे कर्करोगा च्या वाढत्या धोक्याशी संबंधित प्रमुख घटक असल्याचे सांगून, नागरिकांनी या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. निरोगी जीवनशैली, योग्य आहार, व्यसनमुक्त जीवन आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनाचा कर्करोग आणि मुलींच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व यावरही डॉ. बोहरा यांनी मार्गदर्शन केले. मुलींनी योग्य वयात HPV लसीकरण करून घेण्याबाबत पालकांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या जनजागृती उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेंट्रल हॉस्पिटल, मोमिनपुरा व्यवस्थापन तसेच डॉ. मुर्तुजा बोहरा यांनी विशेष सहकार्य केले. इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन च्यावतीने हाफिज खान, सरीन अहमद, अल्तमश राणा, इमरान खान, सईद भाई, मोहम्मद शाद, जुबेर अली, इमरान शेख, तोसिफ देशमुख, मोहतसिम, सलीम चुनावाला, शफीक खान आणि शहनवाज खान यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. सेंट्रल हॉस्पिटल, मोमिनपुरा येथील अध्यक्ष, सचिव, डॉक्टर तसेच सर्व सदस्यांनी अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम सातत्याने आयोजित केल्याबद्दल इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशनचे आभार मानले. भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांसाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. कर्करोगा विषयी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आणि वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.