– भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हातात राहिले नसून त्याला आता राजकीय वळण लागल्याने त्यात अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात एमपीएससीमध्ये विक्रमी भरती करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीच्या मागण्या आणि दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांपासून दूर राहण्याचे आवाहन भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंदोलकांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या आहेत. पण आता चुकीच्या आणि असंवैधानिक मागण्या केल्या जात आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवायचे असेल तर ते अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींकडेच असल्याचा स्पष्ट उल्लेख घटनेतील कलम 317 मध्ये आहे. असे असताना अशी चुकीची मागणी का केली जाते आहे असा प्रश्न पडू लागला आहे. कारण सुरुवातीच्या 12 पैकी 11 मागण्या ऐकायला मुख्यमंत्री तयार आहेत. तुमची बारावी मागणी का पूर्ण होणार नाही? कारण ती असंवैधानिक आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबवले पाहिजे. आता विद्यार्थ्यांच्या भावनेवर खेळायला सुरुवात झाली आहे. दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. बरेचसे विद्यार्थी हे दुष्काळी भागातून आहेत. त्यांच्या जखमेवर बोट ठेवून राजकीय पोळी भाजली जात असल्याचे चित्र आता दिसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करायची आपण संधी दिली पाहिजे. त्यांची दिशाभूल करत राजकीय स्वार्थ पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे, असे आ. पाचपुते यांनी नमूद केले.
यावेळी आ. पाचपुते यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबरला स्थापन झालेल्या समितीचा दौराही सुरू आहे. या समित्या काही ठिकाणी आठ आठ तास विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहेत. 1100 विद्यार्थी अथवा त्यांच्या शिष्टमंडळांचे थेट म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने समिती काम करत आहे तर जी काही शंका, आक्षेप असेल तर आंदोलकांनी समितीकडे ते दिले पाहिजेत. कालच्या आंदोलनात तर काँग्रेसचे युवक अध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सीजेपीचेही आंदोलन सुरु असून सरकारविरोधात आंदोलन असल्याचे चित्र उभे करण्यात येत असल्याचा आरोप आ. पाचपुते यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका ही ऐकण्याची आहे आणि ऐकून निर्णय घेण्याची आहे. एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की एखादा निर्णय घ्यायची अथवा चौकशी लावायची वेळ आली तर आपल्या सरकारची बदनामी झाली तरी चालेल. पण विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही. इतकी ठोस आणि कठोर भूमिका घेण्याची मानसिकता मुख्यमंत्र्यांची आहे तर हा विषय चर्चेने मार्ग सोडवला पाहिजे, अशी अपेक्षा आ. पाचपुते यांनी व्यक्त केली.
पुण्यात आंदोलन करण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात आली. पुण्यात गणेशविसर्जन 48 तास चालते हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे 26 सप्टेंबरला आंदोलन करण्याची परवानगी मागितली गेली. विसर्जनाला पोलीस 48 तास बंदोबस्तात असतात. पुढचे एक – दोन दिवस ते आंदोलनाला परवानगी देऊ शकणार नाहीत ही जाणीव असल्यानेच जाणीवपूर्वक 26 तारखेची मागणी केली गेली. राजकीय नाट्य घडवण्यासाठीच हे सारे सुरु आहे. थोडक्यात सरकार आमच्या आम्हाला आंदोलन करून देत नाही हे चित्र तयार करायचा रोहित पवार यांचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी थांबवणे गरजेचे आहे, असल्याचे मत आ. पाचपुते यांनी व्यक्त केले.





