spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी नागपूर महानगरपालिकेची जय्यत तयारी

– महापौर निता ठाकरे यांनी केली व्यवस्थेची पाहणी

– शहरात ४४७ कृत्रिम विसर्जन कुंड, एक हजार कर्मचारी कर्तव्यावर

नागपूर :- मागील दहा ते बारा दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! च्या गजरात निरोप घेणार आहेत. महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ.विपीन, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांच्यासह इतर सर्व झोन सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी मनपाने जय्यत तयारी केली आहे.

नागपूर महानगरपालिका द्वारा नागरिकांच्या सोयीसाठी सक्करदरा तलाव , गांधीसागर तलाव, पोलीस लाईन टाकळी, कोराडी तलाव, सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा, नाईक तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्थेची महापौर निता ठाकरे यांनी बुधवारी (ता.२३) पाहणी केली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, नेहरूनगर झोन सभापती  सीमा ढोमणे, धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे, एआयएमआयएमचे गटनेता शकील पटेल, नगरसेवक शैलेश पांडे, नगरसेवक प्रमोदसिंह ठाकूर, नगरसेविका  वर्षा डोंगरे, नगरसेविका रेखा निमजे, नगरसेवक शेषराव गोतमारे, मनपाचे उपायुक्त राजेश भगत, मुख्य कार्यकारी अभियंता लिना उपाध्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधिक्षक अभियंता विजय गुरुबक्षाणी, नेहरूनगर झोन सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, सहाय्यक आयुक्त अशोक घराटे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी  नरेद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता राजेश राठोड, नेहरूनगर झोन आरोग्य अधिकारी आनंद खोडसकर, मकरंद संगमवार यांच्यासह मनपाचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान महापौर निता ठाकरे यांनी विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले, तसेच विसर्जन स्थळी बॅरीगेटिंग करण्यात यावी, ठीकठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, विद्युत प्रकाश व्यवस्था उत्तम राखावी, विहिरींच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी, जलतरणपटू यांची नेमणूक करण्यात यावी आदी निर्देश दिले. तर आयुक्त डॉ. विपीन यांनी विसर्जन स्थळावर उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या.

नागपूर शहरात यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक व सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. शहराच्या जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी तब्बल २२५ ठिकाणी एकूण ४४७ कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. नवव्या दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे ४९ ठिकाणी तयार करण्यात आलेल्या १३७ कृत्रिम तलावांमध्ये २ हजार २८६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, यात २ हजार १२४ मातीच्या व १६२ पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

मोठ्या व लहान मूर्तींसाठी विशेष व्यवस्था

शहरात आगमन झालेल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन सुलभ व पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्हावे, यासाठी मनपाने चोख व्यवस्था केली आहे. यात मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, कच्छीविसा आणि कोराडी येथील विशेष मोठे तलाव सज्ज आहेत. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २२ फिरत्या मोबाईल कुंडची (Mobile Tanks) व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृत्रिम तलावांची माहिती आता एका क्लिकवर

नागरिकांना आपल्या घराच्या जवळ कोणता कृत्रिम तलाव किंवा विसर्जन स्थळ आहे, याची माहिती शोधण्यासाठी कुठेही भटकण्याची गरज भासणार नाही. यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष संकेतस्थळ https://ganpati-zone-map.emergent.host आणि क्यूआर कोड तयार केला आहे. हा क्यूआर कोड नागरिकांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यास, त्यांना आपल्या घराजवळ असलेल्या झोननिहाय कृत्रिम तलावांची सविस्तर माहिती मिळवता येईल. तसेच, त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपचे दिशादर्शक नेव्हिगेशन देखील उपलब्ध राहणार आहे. हा क्यूआर कोड मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निर्माल्यापासून होणार खतनिर्मिती १८ निर्माल्य रथांची सेवा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून बाप्पाच्या विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये एकूण १८ निर्माल्य रथ सेवा देणार आहेत. या निर्माल्य रथांद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्री गणेशाचे निर्माल्य श्रद्धापूर्वक संकलित केले जात आहे. संकलित केलेले हे संपूर्ण निर्माल्य भांडेवाडी येथील प्रकल्पात नेऊन त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल व त्यापासून खत तयार केले जाईल.

निर्माल्य रथासाठी टोल फ्री नंबर

निर्माल्य रथा संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी मनपाने 1800 2677 966 हा टोल फ्री लोकांसाठी उपलब्ध केला आहे.

१ हजार कर्मचारी कर्तव्यावर

शहरात चोख स्वच्छता राखण्यासाठी दहाही झोनमध्ये एक हजार स्वच्छता कर्मचारी युद्धपातळीवर तैनात करण्यात आले आहेत, नागपूरकरांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नागपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.