spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निर्विघ्न विसर्जनासाठी महावितरण सज्ज; ‘सुरक्षा प्रथम’ बाळगण्याचे आवाहन

नागपूर :- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नागपूर शहर सज्ज झाले आहे. अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात विसर्जन पार पडेल. विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. महापालिकेने शहरात 225 ठिकाणी तब्बल 447 कृत्रिम कुंड तयार केले असून, या सर्व भागांत अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

विसर्जन मिरवणुकीचे मुख्य मार्ग आणि विसर्जन स्थळांची पाहणी महावितरणच्या टीमने आधीच पूर्ण केली आहे. रस्त्यावरील विद्युत यंत्रणेची डागडुजी करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिकारी व कर्मचारी विसर्जन संपेपर्यंत प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाच्या या उत्साहात विद्युत अपघात टळावेत, यासाठी महावितरणने नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांसाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:

मार्गाची पाहणी करा: विसर्जनाला निघण्यापूर्वी मिरवणूक मार्ग व्यवस्थित तपासून घ्या. रस्त्यावरील विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि ट्रान्सफॉर्मरची माहिती ठेवा. विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा योग्य उंचीच्या वाहनांचाच वापर करा.

दर्जेदार सामान वापरा: मंडप व मिरवणुकीतील सजावटीसाठी केवळ आयएसआय (ISI) मार्क असलेल्या चांगल्या दर्जाच्या वायर्स आणि उपकरणांचा वापर करा. उघड्या वायर्स किंवा कच्चे जोड धोक्याचे ठरू शकतात. जनरेटर व बॅटरी सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि ओल्या जागेवर विजेची उपकरणे वापरणे पूर्णपणे टाळा.

मिरवणुकीत खबरदारी घ्या: उंच मूर्ती असेल तर तारांपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी पुढे सतर्क स्वयंसेवक ठेवा. जनरेटर ट्रॉली इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर असू द्या. मिरवणुकीतील प्रत्येकाला विजेच्या सुरक्षेबाबत आधीच कल्पना द्या.

विसर्जन स्थळावर काळजी: महापालिकेने ठरवून दिलेल्या कृत्रिम कुंडातच विसर्जन करा. पाण्यात उतरण्यापूर्वी आसपास तुटलेल्या वायर्स किंवा उघडे स्विचेस नाहीत ना, याची खात्री करा. मूर्तीसोबत विजेचे कोणतेही साहित्य पाण्यात टाकू नका.

आपत्कालीन प्रसंगी काय कराल?: कुठेही विजेची ठिणगी, तुटलेली तार किंवा उघडा बॉक्स दिसल्यास लगेच महावितरण किंवा पोलिसांना कळवा. दुर्दैवाने कोणाला विजेचा धक्का बसल्यास त्याला हाताने किंवा धातूच्या वस्तूने न शिवता, लाकडी काठी वा प्लास्टिकच्या साहाय्याने विजेपासून दूर करा आणि तात्काळ दवाखान्यात न्या.

गणेश विसर्जन हा आपल्या श्रद्धेचा सण आहे. या आनंदावर कोणतेही विरजण पडू नये म्हणून सर्वांनी ‘सुरक्षा प्रथम’ हा नियम पाळावा आणि उत्सव सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.