नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) आणि भीम आर्मी च्यावतीने ‘संपूर्ण भागीदारी महाआंदोलना’अंतर्गत विविध घटनात्मक, सामाजिक व आरक्षणासंदर्भातील २२ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या देशव्यापी आवाहनानुसार आयोजित या आंदोलनाचा उद्देश शोषित, वंचित, बहुजन, अल्पसंख्याक तसेच मागासवर्गीय समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी आवाज उठविणे हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण व SC, ST, OBC महिलांसाठी ‘कोट्यातील कोटा’, लोकसभा- विधानसभेत OBC समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व, जातनिहाय जनगणनेत OBC साठी स्वतंत्र नोंद, उच्च न्यायव्यवस्थेत SC, ST, OBC प्रतिनिधित्व आणि उच्च न्यायिक आयोगाची स्थापना यांचा समावेश आहे.
तसेच OBC क्रीमी लेअरची उत्पन्नमर्यादा सुधारावी, पदोन्नतीत SC, ST, OBC आरक्षण लागू करावे, उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव रोखण्यासाठी प्रभावी कायदेशीर तरतुदी कराव्यात, SC- ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील नुकसानभरपाई वाढवावी, सरकारी योजना व अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सेदारी द्यावी, सरकारी कंत्राटे व खरेदीमध्ये आरक्षण लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. खासगी क्षेत्रात व्यवस्थापन व नेतृत्वाच्या पदांवर वंचित घटकांना प्रतिनिधित्व, मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, आरक्षणाचा प्रलंबित अनुशेष भरणे, सरकारी सेवांमधील लॅटरल एंट्री व कंत्राटी पद्धतीला विरोध, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वसतिगृहांची निर्मिती तसेच माध्यम क्षेत्रात वंचित समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.सफाई कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती, समान कामासाठी समान वेतन, सामाजिक सुरक्षा व पेन्शन देणे, सीवर व सेप्टिक टँक साफसफाईसाठी मानवी प्रवेश पूर्णपणे बंद करून आधुनिक यंत्रांचा वापर करणे, तसेच दुर्घटनेत सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाख रुपये मदत, सरकारी नोकरी व पुनर्वसन देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आजाद समाज पार्टी (कांशीराम) व भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या राष्ट्रपतींकडे पाठवाव्यात आणि संबंधित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी निवेदन देते वेळी आजाद समाज पार्टी कांशीरामचे जिल्हा अध्यक्ष ओपूल तामगाडगे, जिल्हा सचिव विशाल बनसोड, सूरज पुराणिक, रोशन ठवरे, दीक्षा चवरे, अशीत पाटील, अमन पाटील, अश्विन पाटील, दीपक पाटील, बादल बनसोड, प्रथम पानसे, बाळा पाटील, साशंक भोयर, सौरभ गुप्ता, मयुर बागडे, श्याम चोपडे, सचिन जयस्वाल वंदना इंगळे (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महिला ब्रिगेत) नेह राऊत (नागपुर जिल्हा अध्यक्ष महीला ब्रिगेट) राहुल जगताप (नागपूर जिल्हा सचिव) आकाश गाझ्भिये (नागपुर जिल्हा महासचिव) संघरतना गेडाम (नागपुर जिल्हा उपाध्यक्ष) पौर्णिमा वानखेडे (उत्तर नागपूर महासचिव) सीला वासनिक (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष) शेखर उके (कामठी विधानसभा अध्यक्ष) शकील मदारी, पुरुषोत्तम तायवाडे, नायांशू लोखंडे, हर्ष डोंगरे प्रत्रकार संघाच्या सुजाता मसराम पत्रकार संघाचे वसंता पाटील इत्यादीची उपस्थिती होती.





