दुष्काळ जाहीर करताना दुजाभाव नको; वगळलेल्या तालुक्यांचा तातडीने समावेश करा — खा. डॉ. प्रशांत पडोळे

0
5

हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करताना राज्य सरकारने भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश केला; मात्र मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोली तालुक्यांना वगळून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. दुष्काळाची तीव्रता तालुक्याच्या सीमेवर बदलत नाही, त्यामुळे शासनाने केलेला हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असा संतप्त इशारा भंडारा–गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.

खासदार पडोळे यांनी मोहाडी व तुमसर तालुक्यातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पावसाअभावी पिके करपली असून किडींच्या प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. “शेतकऱ्यांचे अश्रू व्हिडिओ कॉन्फरन्सवरून दिसत नाहीत, त्यासाठी बांधावर जावे लागते,” असा टोला लगावत त्यांनी कागदी निकषांऐवजी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आवाहन केले.

शासनाने मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली या तालुक्यांचा तातडीने फेरआढावा घेऊन त्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा न पाहता जर न्याय मिळाला नाही, तर काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला.